मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजप आणि शिवसेना युतीची काडीमोड झाल्यानंतर बळी गेलेले माजी केंद्रीय अवजड मंत्री अरविंद सावंत यांचे आज पुनर्वसन करण्यात आले. केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या राज्यातील विविध प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी असलेल्या महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येत आहे.
हेही वाचा - प्रेमविवाह न करण्याच्या 'त्या' शपथेवर पंकजा मुंडेंना संताप; म्हणाल्या...
तत्कालीन एनडीए सरकारचा भाग असलेल्या शिवसेनेतील खासदार अरविंद सावंत यांना केंद्रीय अवजड उद्योगमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. भाजप-शिवसेनेचा काडीमोड झाल्यानंतर सावंत यांनी राजीनामा देऊन खासदार राहणेच पसंत केले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील संसद सदस्यांची बैठक झाली होती. त्यामध्ये केंद्र शासनाकडे प्रलंबित प्रस्तावांबाबत चर्चा झाली होती. या प्रस्तावांचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यासाठी खासदार अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
हेही वाचा - सनदी अधिकार्यांच्या बदल्यांचा सपाटा तिसऱ्या दिवशीही सुरूच
समितीचे अध्यक्ष सावंत यांचे कार्यालय नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे असेल, त्यांना कामकाजासाठी आवश्यक सुविधा तसेच अधिकारी, कर्मचारी नवी दिल्लीतील सचिव तथा निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन यांच्याकडून देण्यात येणार आहेत.