मुंबई - कोरोना प्रादुर्भावाच्या काळात हजारोंच्या नोकऱ्या धोक्यात असताना, रायगडच्या माणगावमध्ये हजारोंना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. माणगावमध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून यातून हजारो स्थानिकांना रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबईत दिली. देसाई म्हणाले की, दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रिअल कॉरीडॉर प्रकल्पांतर्गत दीघी औद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या क्षेत्रांपैकी ६ हजार हेक्टर क्षेत्रावर माणगाव एमआयडीसी स्थापना करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
दक्षिण रायगड जिल्ह्यात डीएमआयसीसाठी एकूण १२ हजार १४० हेक्टर क्षेत्र २०११ मध्ये अधिसूचित करण्यात आले. त्यापैकी ३ हजार २७७ हेक्टर क्षेत्राचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांनी संमती न दिलेली व वन विभागाच्या ताब्यातील क्षेत्रे यापूर्वीच वगळण्यात आलेली आहेत. त्यामुळे यासंदर्भात वादाचे मुद्दे यायला वाव नाही, असेही देसाई यांनी सांगितले. यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रात डीएमआयसी अंतर्गंत उद्योग नगरी स्थापन केली आहे. परंतु, केंद्र सरकारने मान्य केलेले सहाय्यक अनुदान प्राप्त न झाल्याने विकासाची गती काहीशी धिमी झाली असल्याचे देसाई यांनी कबुल केले. दरम्यान, रायगड जिल्ह्यात थेट परकीय गुंतवणुकीतून व देशांतर्गंत उद्योग समुहांकडून विशाल प्रकल्प उभारण्यासाठी भूखंडांची मागणी होत आहे.
माणगाव तालुक्यात ३२७७ हेक्टर इतक्या क्षेत्राचा ताबा एमआयडीसीला प्राप्त झाला असून महामंडळ स्वतःच्या व खासगी सहभागातून या क्षेत्रावर पायाभूत सुविधा निर्माण करू शकते. राज्याची स्वतःची क्षमता, गुंतवणुकदारांची मागणी व कोकणात रोजगार निर्मितीची निकड लक्षात घेऊन राज्य शासनाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला आहे. भूखंड मागणीसाठी संदर्भात दहा गुंतवणूकदारांनी एमआयडीसीकडे विचारणा व मागणी केली आहे. सदर चर्चा प्रगत अवस्थेत असल्यामुळे माणगाव एमआयडीसी स्थापन करण्याच्या विषयी उद्योग विभागाने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या प्रस्तावाची माहिती दिली व मंगळवारी मंत्रिमंडळाने सहा हजार हेक्टर क्षेत्रावर माणगाव एमआयडीसी स्थापन करण्यास मंजुरी दिली असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.