दिल्ली - मुंबईतील अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणांत एनआयए आणि एटीएस तपास करत आहेत. एनआयएला राज्य सरकारचे पूर्ण सहकार्य आहे. त्याचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. एनआयएच्या संपूर्ण अहवालानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. आज शुक्रवारी अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पवारांना मिहान प्रकल्पाबाबत माहिती दिली -
ते म्हणाले, नागपुरातील मिहान प्रकल्पामध्ये आतंराराष्ट्रीय कंपन्यांचा गुंतवणूक करण्याचा विचार आहे. यामुळे ती इंडस्ट्री विदर्भात यावी. विदर्भातील तरुणांना या माध्यमातून रोजगार मिळावा हा आमचा उद्देश्य आहे. या विषयावर शरद पवारांसोबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत आलो. याबरोबरच मिहान प्रकल्पाबाबतच्या डिटेल्स पवार यांना दिल्या आहेत. त्यांच्याशी याबरोबर सविस्तर चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
अहवालानंतरच कारवाई -
यादरम्यान, मुंबईतील अँटिलिया प्रकरणात काय घडामोडी घडत आहेत, याबाबत पवारांना माहिती दिली. एनआयएला राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य आहे. आरोपींचे नावे समोर येणे गरजेचे आहे. एनआयएचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार पुढील कारवाई करेल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - अँटिलिया प्रकरण : आतापर्यंत 5 गाड्या जप्त; प्रकरणांचं वाढतंय गूढ