मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या हिवाळी सत्राच्या विविध विद्याशाखेच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध केंद्रावर सुरू आहेत. अकृषी विद्यापीठ, महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय, महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने दिनांक २ फेब्रुवारी २०२३ पासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. सदर आंदोलनामुळे परीक्षेच्या कामकाजामध्ये अडचणी निर्माण झाल्याने मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ पासून स्थगित करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
बैठकीत तोडगा नाही : मुंबई विद्यापीठात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. यासंदर्भात या सर्व संघटनांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यातूनही कोणताही तोडगा निघाला नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते.
या परीक्षा झाल्या : गुरुवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई विद्यापीठाच्या १० परीक्षा सुरळीत पार पडल्या. त्यात एमए सत्र ४, एमए हिंदू स्टडीज, एमएस्सी सत्र ४, एमकॉम सत्र २ (सिबीजीस), एमकॉम सत्र २ (चॉईसबेस), एलएलबी सत्र ३, एलएलबी / बीएलएस सत्र ३ (५ वर्षीय ), एमकॉम भाग १ (वार्षिक), बी.व्होक. हेल्थ केअर सत्र ५, बी.व्होक. हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम सत्र ५ या परीक्षा काल झाल्या आहेत. त्यानंतर ३ व ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परिक्षा रद्द झाल्या होत्या.
सोमवार पासून परिक्षा : मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा सोमवार दिनांक ६ फेब्रुवारीपासून निर्गमित केलेल्या निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू होणार आहेत. स्थगित करण्यात आलेल्या ३ व ४ फेब्रुवारी दोन पेपरचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेस्थळावर प्रदर्शित केले जाईल अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी दिली.
हेही वाचा - Satyajeet Tambe : मी अपक्षच राहून कार्य करणार; सत्यजित तांबेंचे स्पष्टीकरण