मुंबई- अभिनेता इरफान खान यांचे निधन हे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी, कलाजगतासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या अकाली निधनाने एक दमदार अभिनेता, संवेदनशील माणूस, लढाऊ व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. सहजसुलभ अभिनयातून साकारलेल्या विविधांगी व्यक्तिरेखांमुळे इरफान खान कायम रसिकांच्या स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
हेही वाचा- पन्नाशीवरील कर्मचाऱ्यांना 'फील्ड ड्युटी' नाही, पुणे पोलिसांचा निर्णय
अभिनेता म्हणून इरफान खान निश्चितंच महान होते. त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका त्यांच्या अष्टपैलू अभिनय कौशल्याची साक्ष देतात. कॅन्सरसारख्या आजारावर मात करुन त्यांनी त्यांच्यातला लढाऊपणा दाखवून दिला होता. परंतु, आज अचानक आलेली त्यांच्या निधनाची बातमी ही माझ्यासारख्या असंख्य चित्रपट रसिकांसाठी, त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, असे उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटले आहे.