मुंबई: पक्षाचे अध्यक्ष नसतील तर ते पक्षात नाहीत, असा गैरसमज करू नका. पवार हेच पक्ष आहेत. खर्गे हे पक्षाध्यक्ष असले तरी सोनिया गांधी हे पक्ष चालवितात. नवीन अध्यक्ष हे शरद पवारांच्या मार्गदर्शनानुसार काम करणार आहेत. आपला परिवार असाच पुढे काम करणार आहे. भाकरी फिरवायची असते असे शरद पवारांनी सांगितले. आज तरी साहेब भूमिकेवर ठाम आहेत. नवीन अध्यक्षाला साध देऊ, अध्यक्ष नवनवीन शिकतील, त्यामुळे काळजी करू नका, असे पवार यांनी सांगितले.
अखेर पवारांनी भाकरी फिरविली: गेल्या ६० वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ओळख असलेले शरद पवार आता संसदीय राजकारणात दिसणार नाही. योग्य वेळी भाकरी फिरवावी लागते, ती नाही फिरवली तर ती करपते, असं सूचकपणे शरद पवार म्हणाले होते. आज त्यांनी भाकरी फिरविण्याची सुरुवात स्वत:पासून केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याचे सांगत पुन्हा निवडणुकीला उभा राहणार नाही, अशी मोठी घोषणा शरद पवार यांनी केली. प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर कुठेतरी थांबण्याचा विचार मनात आला, असे सांगताना आता नवा अध्यक्ष कोण, याचा विचार पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी करावा, असे शरद पवार म्हणाले.
अजित पवारांची वेगळी भूमिका: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी त्यांचा निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. त्याचवेळी दुसरीकडे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मात्र वेगळी भूमिका मांडली. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवा अध्यक्ष काम करेल. देशभरात मीटिंग करणे, लोकांना भेटणे सुरू राहील. कुणी पण अध्यक्ष झाले प्रांताध्यक्ष झाले तरी शरद पवार यांच्याच मार्गदर्शनाखाली हा पक्ष चालणार आहे. हा निर्णय कालच होणार होता; मात्र काल 1 मे असल्यामुळे निर्णय जाहीर केला नाही. आज ना उद्या हा निर्णय होणार होता, असे सांगत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी वेगळी भूमिका मांडली आहे.
सुप्रिया सुळे तुम्ही गप्प बसा: उद्या नवीन अध्यक्ष झाला तर अडचण काय आहे? शरद पवारांनी हाक दिल्यावर सगळे एकत्र येणार आहेत. खासदारकी, आमदारकी बाबत सर्व निर्णय तेच घेतील. हा निर्णय कालच होणार होता, असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना शांत केले. अजित पवारांनी वेगळी भूमिका मांडली तरी कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा या भूमिकेवर कार्यकर्ते ठाम आहेत. तसेच अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना न बोलण्याचा देखील सल्ला दिला.