मुंबई- पंचशील नगर चेंबूर येथे मागील तब्बल १७३ दिवसांपासून एस.आर.ए. योजनेअंतर्गत इमारत बांधकाम विकासक यांनी प्रकल्प बाधित रहिवाशांना घरे, त्यांचे धार्मिक स्थळ बुद्धविहारसह आवश्यक सुविधा दिलेल्या नाहीत. यामुळे येथील रहिवाशांनी साखळी उपोषणाचे अहिंसक आंदोलन सुरू केले आहे.
आज बुद्ध जयंतीदिनी अहिंसकपणे बुद्ध प्रतिमेची स्थापना करण्यात येणार असल्याचे सोसायटीचे सचिव रामभाऊ शिंदे यांनी सांगितले. तसेच हा लढा उपोषणकर्त्यांना न्याय मिळेपर्यंत सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
चेंबूरच्या पंचशील नगरमध्ये हक्काच्या घरासाठी व धार्मिक स्थळ बुद्धविहारसाठी महिलांचे साखळी उपोषण सुरू आहे. आज साखळी उपोषणाचा १७३ वा दिवस आहे. आज बुद्धपोर्णिमेच्या निमित्ताने बुद्धविहाराची मूर्ती स्थापना संकल्प हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे मनीषा सुरेश बनसोडे यांनी सांगितले.
आज बुद्धपोर्णिमा आहे. त्यामुळे आज शांतीचा मार्ग आहे. आज आम्हाला आमच्या हक्काचे घर आणि एसआरएने बुद्धविहाराची जी जागा दाखवली आहे, त्या ठिकाणी आम्ही शांतीच्या मार्गाने आज जाऊन बुद्धमूर्तीची स्थापना करणार आहोत. त्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, आमचे बुद्धविहार हे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे आज बुद्धपोर्णिमा निमित्ताने बुद्धविहाराची मूर्ती स्थापना संकल्प हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे उपोषणकर्ते अॅड. संतोष सांजकर यांनी सांगितले.