मुंबई - मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. हे माझे स्वप्न आहे, आज जर माझे आजोबा असते, तर माझ्या पाठीवर अभिमानाची थाप दिली असती, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले. ते दिंडोशी मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार सुनील प्रभू यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रभर जनआशीर्वाद यात्रेत फिरत असताना, काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष कुठेच दिसला नाही. त्यांना लाज वाटते की, नाही माहित नाही. 15 वर्षे त्यांनी पापं करून ठेवली, महाराष्ट्राची वाट लावून ठेवली आहे अशी टीका ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली.
हेही वाचा - जास्त व्याजासाठी मुंबई महापालिकेची खासगी बँकांकडे धाव
गेली 5 वर्षे आम्ही काय केलं? असा प्रश्न विचारला जातो. गेली 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात जी कामं व्हायला हवी होती, ती आम्ही 2019 ला पूर्ण केली. ही सभा सुनील प्रभूंसाठी नाही, तर माझ्यासाठी घेतली. मला एक संधी द्या. प्रभू यांच्या कामाची पद्धत खूप वेगळी असून शिकण्यासारखी आहे. मी वरळीमधून निवडणूक लढवतोय, प्रभू यांच्याकडून मला शिकण्याची संधी हवी आहे, असे आवाहन ठाकरेंनी केले. तसेच मुंबईतील युतीचे 36 उमेदवार निवडून येतील आणि आपलं सरकार सत्तेवर येईल, असा विश्वासही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.
हेही वाचा - शिवसेनेच्या गीता भंडारी होणार नगरसेविका; महापालिकेतील शिवसेनेच्या संख्याबळात वाढ