मुंबई - आपण कोरोनाचे युद्ध चांगल्या प्रकारे लढत आहोत. रुग्णसंख्या वाढत असली तरी घाबरुन जाऊ नका, असा धीर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई पालिकेतील नगरसेवकांना दिला.
संपूर्ण मुंबईतील प्रत्येक प्रभागात कोरोनाची सद्यस्थिती व करण्यात आलेला उपाययोजना तसेच पावसाळापूर्व कामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्व नगरसेवकांसोबत आज ऑनलाईन संवाद साधून आढावा घेतला. त्याचप्रमाणे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सर्व नगरसेवकांच्या समस्यांची नोंद घेऊन त्या प्राधान्याने सोडणार असल्याचे सांगितले. त्यासोबत ज्या प्रभागांमध्ये कोरोना नियंत्रण आणण्यात यश मिळवले आहे, त्या प्रभागाच्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागात केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली.
प्रत्येक विभागात वॉर रूम कार्यान्वित करण्यात आली असून जर कोणत्या विभागात वॉर रूमबद्दल समस्या असल्यास तातडीने कळविण्याबाबत पर्यावरण मंत्र्यांनी सर्वांना निर्देश दिले. नगरसेवकांनी आपल्या ऑनलाईन संवादामध्ये जे विषय मांडले त्यामध्ये प्रभागात असलेली कोरोना रुग्णांची संख्या, विलगीकरण सुविधा आदींची माहिती दिली. त्यासोबतच आपल्या प्रभागातील प्रलंबित कामांची यादी सादर करण्याची सूचना पर्यावरण मंत्र्यांनी यावेळी सर्व नगरसेवकांना केली. त्यासोबतच कुठल्या प्रभागांमध्ये नालेसफाईबाबत अडचण असल्यास नवीन मशीन तातडीने त्या प्रभागात पाठवून समस्या निकाली काढणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. तसेच नगरसेवकांच्या सर्व प्रश्नांची लिखीत नोंद घेतली असून त्या प्रश्नांवर पाठपुरावा करून ते सोडविणार असल्याचे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले. या संपूर्ण ऑनलाइन बैठकीचे समन्वयन आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी केले.