मुंबई : बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची एनसीबीकडून चौकशी झाली आहे. पण, त्याला क्लिनचिट दिली नाही, असे एनसीबीकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. एवढेच नाही तर अर्जुन रामपाल हा साऊथ आफ्रिकेला पळून जाण्याच्या तयारीत होता. यामुळे एनसीबीकडून रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रिका कौंसुलेटला पत्र लिहिण्यात आले आहे, असेही एनसीबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
50 हजार पानांचे आरोपपत्र न्यायालायत दाखल
सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अमली पदार्थांच्या तस्करी संदर्भात एनसीबीकडून आरोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात 33 आरोपी दाखवण्यात आलेले आहेत. जवळपास 50 हजार पानांचे आरोप पत्र आहे. यात अर्जुन रामपाल याच्या प्रेयसीचा भाऊ आगीसीलाओस याचेही नाव नमूद करण्यात आलेले आहे. याबरोबरच सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंत याचेही नाव या आरोप पत्रामध्ये आहे.
अर्जुन रामपालने दिली ही माहिती
एनसीबीकडून अर्जुन रामपालची दोन वेळा चौकशी करण्यात आली. 13 नोव्हेंबर 2020 रोजी दिलेल्या जबानीत अर्जुनने त्याची शैक्षणिक पात्रता, वैयक्तिक, मॉडेलींग, चित्रपटातील कामकाज आणि आर्थिक स्थिती बद्दल एनसीबीला माहिती दिली होती. अर्जुनच्या घरात ultracet व clonazepam dispersible tablet ही दोन औषधे मिळाली होती. यातील एक औषध अर्जुनच्या पाळीव श्वानासाठी होते. तर दुसरे औषध त्याच्या बहिणीसाठी आणल्याचे अर्जुने एनसीबीला दिलेल्या जबानीत सांगितले होते.
प्रेयसीच्या भावाला अर्जुन जवळून ओळखत नाही
अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रियल आहे. तिचा भाऊ आगीसीलाओस आहे. हा अर्जुनच्या नावाचा वापर करून बॉलिवूडमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचा संशय एनसीबीला होता. एनसीबीचा दावा आहे की अर्जुन रामपाल हा स्वतः या अमली पदार्थ तस्करीचा एक भाग आहे. त्यामुळे एनसीबीने अर्जुनला त्याच्या प्रेयसीच्या भावाबद्दल विचारले. तेव्हा आगीसीलाओसाला आपण जवळून ओळखत नाही, 10 ते 12 वेळा तो भेटला असल्याचे अर्जुनने सांगितले. मात्र, यानंतर काही व्हाट्सअप चॅट एनसीबीकडून अर्जुन रामपालला दाखविण्यात आले होते. त्यावर याबद्दल आपल्याला कुठलीही माहिती नाही. या चॅटमध्ये ज्या अर्जुन रामपाल नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे तो मी नाही, असा दावा अर्जुनने केला आहे.