पायल तडवी प्रकरण : आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी - demand
पायलला कोणीही आत्महत्येसाठी प्रवृत्त केले नाही, असा युक्तिवाद आरोपींचे वकील आबाद पोंडे यांनी केला. माझ्या तिन्ही आशिलांना जामीन याचिकाही दाखल करू दिली नाही, या प्रकरणाची मीडिया ट्रायल होते, असेही पोंडे यांनी सांगितले.
मुंबई - येथील नायर रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण घेणारी डॉ. पायल तडवीने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणातील तिनही आरोपींना आज विशेष सत्र न्यायालयाने ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ. पायलच्या वकीलाकडून ही आत्महत्या नाही तर हत्या आहे, पायलच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुना आहेत. त्यामुळे आरोपींवर ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी डॉ. तडवीचे वकिल अॅड. नितीन सातपुते यांनी केली आहे.
नायर रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉ. तडवी हिने डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या वरिष्ठ डॉक्टरांच्या मानसिक जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. यानंतर या तिनही डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सर्व आरोपी फरार झाल्या होत्या. पोलिसांनी या आरोपींना अटक करून आज सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयात सुनावणीदरम्यान तिनही आरोपी डॉक्टरांच्या बाजूने अॅड. आबात पोंडा आणि संदीप बाला यांनी बाजू मांडली. ज्यामध्ये पोलिसांकडे गुन्हा दाखल करतेवेळी फक्त मागासवर्गीय म्हणून पायलचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून ती एससी किंवा एसटी या जातीतली आहे हे सिद्ध होत नाही तर ओबीसीसुद्धा असू शकते. पोलिसांकडे देण्यात आलेल्या कोणत्याही तक्रारीत आदिवासी म्हणून उल्लेख नाही, त्यामुळे ही केस अॅट्रॉसिटीची होऊ शकत नाही. शिवाय व्हॉटसपवरील संभाषणात सुद्धा आदिवासी किंवा ती अन्य कुठल्या जातीची म्हणून संभाषण असल्याचे पोलीस तपासात समोर आले नाही.
पायलच्या आईने असे सांगितले की, पायलला काम करू दिले जात नव्हते. पण, आत्महत्येच्या दिवशी पायलने या आरोपी डॉक्टरांबरोबर काम केले होते. जे व्हॉटअपमध्ये चॅट झाले आहे, त्यात कोणतीही जातीवाचक टीका झालेली नाही. पायलचे काम बरोबर नव्हते, असे डेटामधून बाहेर आले आहे. पायलला कोणीही आत्महत्येसाठी प्रवृत्त केले नाही, असा युक्तिवाद आरोपींचे वकील आबाद पोंडे यांनी केला. माझ्या तिन्ही आशिलांना जामीन याचिकाही दाखल करू दिली नाही, या प्रकरणाची मीडिया ट्रायल होते, असेही पोंडे यांनी सांगितले. तर, पायल ताडवी हिचा केवळ मानसिक छळ नसून शारीरिक छळसुद्धा करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली, त्यामुळे कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. पायल ताडवीच्या मृतदेहावर जखमा होत्या, असे वकील नितीन सातपुते यांनी सांगितले.
३१ मे रोजी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार असून या प्रकरणाला नक्की कोणते वळण मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.