मुंबई - दिवसेंदिवस देशासह राज्यात कोरोनाचा कहर वाढतच असल्याचे चित्र दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 9 लाखांच्या पुढे गेला आहे. अशात आता कोरोना योद्धे अर्थात डॉक्टरच मोठ्या संख्येने कोरोनाचे शिकार होत आहेत. आतापर्यंत देशात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या 99 डॉक्टरांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर 1 हजार 309 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. देशाचा मृत्यूदर 5 टक्के असताना आयएमएच्या डॉक्टरांचा मृत्यूदर 10 टक्के असल्याने आयएमएने यावर चिंता व्यक्त केली आहे. तर आता आपल्या सर्व डॉक्टरांसाठी रेड अलर्ट जारी करत अधिक काळजी घेण्यास सांगितले आहे.
आयएमएच्या आकडेवारीनुसार मार्चपासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 1 हजार 302 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 586 प्रॅक्टिशनर डॉक्टर, 566 रेसिडेन्स डॉक्टर, 100 हाऊस सर्जन आहेत. तर यातील 99 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक 73 मृत्यू हे 50 वर्षापुढच्या डॉक्टरांचे झाले असून, ही टक्केवारी 75 टक्क्यांच्या घरात आहे. तर 35 वर्षापर्यंत 7 तर 35 ते 50 वयोगटातील 19 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
देशातील मृत्यू दर 5 टक्के असताना डॉक्टरांचा मृत्यूदर 10 टक्के आहे. त्यामुळे आता डॉक्टरांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. त्यात आता आयएमएने रेड अलर्ट जारी करत डॉक्टरांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन केल्याची माहिती आयएमए सदस्य आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली आहे. आम्ही डॉक्टर योग्य ती खबरदारी घेत आहोत. पण तरीही अनेक डॉक्टर कोरोनाग्रस्त होत आहेत. काहींचा बळी जात आहे. तेव्हा पीपीई किटच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे आता सरकारने पीपीई किटच्या दर्जावर विशेष लक्ष द्यावे, अशी मागणीही डॉ. उत्तुरे यांनी केली.