मुंबई : गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने ही कारवाई मुर्तुझा चेंबर्स, नंदलाल जानी मार्ग, दानाबंदर, मस्जिद बंदर येथे केली आहे. या कारवाईत वेगवेगळ्या फ्लेवर्सचे ई सिगारेट्सचे 10 बॉक्स आणि इनोव्हा कार जप्त करण्यात आली आहे. एकूण जप्त मालमत्तेची किंमत 81 लाख आहे. त्यात 66 लाखांच्या ई सिगारेट्स आहेत. 4 मार्चला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षामार्फत दानाबंदर, मस्जिद बंदर, मुंबई येथे अवैध दारु पासींग संदर्भातील वाहनांची तपासणी करताना एक इनोव्हा कार चालकास थांबविण्याचा इशारा केल्यानंतर सुध्दा चालकाने वाहन न थांबविता पळून जाण्याचा प्रयत्न केला.
ई-सिगारेटस सापडले : मालमत्ता कक्षाचे अधिकारी व अंमलदार यांनी पळ काढणाऱ्या इनोव्हा कारचा पाठलाग करून चालकास वाहनासह अटक केले. त्या इनोव्हा कारची दोन पंचासमक्ष तपासणी केली. त्या कार मध्ये YUOTO THANOS या कंपनीचे विविध फ्लेवर असलेले एकूण १० कार्डबोर्ड बॉक्स मिळून आले. सापडलेल्या सर्व बॉक्सची तपासणी केली असता प्रत्येक बॉक्समध्ये एकुण ३०० नग ई-सिगारेटस् मिळून आल्या. ई-सिगारेटसचा साठयाची अंदाजे किंमत ६६ लाख इतकी आहे. हा साठा वाहतुक करणारी इनोव्हा कारसह ताब्यात घेण्यात आली आहे.
आदिक चौकशी सुरू: याबाबत डोंगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून, हा गुन्हा पुढील तपासाकरीता मालमत्ता कक्षास वर्ग करण्यात येत आहे. अटक आरोपी हा 33 वर्षाचा असेल त्याची चौकशी केली जात आहे. ही कामगिरी विवेक फणसाळकर, पोलीस आयुक्त, देवेन भारती विशेष पोलीस आयुक्त, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), प्रशांत कदम, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी स्पेशल) यांच्या निगराणीखाली मालमत्ता कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पवार, पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, संदीप निगडे, समीर शेख, पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, पोलीस हवालदार सुकाळे, इरनक, सावंत, पदमन, आदींनी बजावलेली आहे.