मुंबई - निविदा काढल्या नसल्या तरी एमएमआरडीए प्रशासनाने सर्व खर्चाची माहिती अद्यावत ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरुन कोणालाही याचे निरीक्षण करणे सहज शक्य होईल, अशी मागणी ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे. गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाला कोविड 19 अंतर्गत बांधलेल्या रुग्णालयावर किती रुपये खर्च झाले? असे माहिती अधिकारात विचारले होते. या पार्श्वभूमीवर गलगली यांनी ही मागणी केली आहे.
मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावानंतर खाटा मिळणे कठीण झाले होते. अशावेळी एमएमआरडीए प्रशासनाने कोविड19 अंतर्गत बांधलेल्या रुग्णालयावर तब्बल 53 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती एमएमआरडीए प्रशासनाने गलगली यांना दिली आहे. प्रत्येक खाटांमागे 25 हजार रुपये खर्च झाला असून 2118 खाटा तयार करण्यात आल्या आहेत.
गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे कोविड 19 अंतर्गत बांधलेल्या टप्पा एक आणि टप्पा दोन मधील रुग्णालयाची माहिती विचारली होती. गलगली यांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, एकूण 53 कोटी खर्च करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सिव्हील आणि इलेक्ट्रिकल यावर 14 कोटी 21 लाख 53 हजार 825 रुपये इतका खर्च झाला आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 21 कोटी 55 लाख 25 हजार 353 रुपये खर्च झाला आहे. दोन्ही टप्प्यात खाटांची संख्या 1059, असे एकूण 2118 अशी आहे. पहिल्या टप्प्यात उपकरण आणि साहित्यावर 5 कोटी 26 लाख 47 हजार 406 रुपये खर्च करण्यात आले असून द्वितीय चरणात 12 कोटी 6 लाख 33 हजार 259 रुपये खर्च करण्यात आले आहे. या सुविधांमध्ये ऑक्सिजन, आयसीयू, डायलिसिस, ट्रायेज यांचा समावेश आहे.
कोविड 19 अंतर्गत खरेदी, कामे आणि सेवा आपत्कालीन परिस्थिती व तातडीची निकड असल्याने उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय तसेच विशेष परिस्थिती व तातडीची खरेदी यानुसार केंद्र शासनाच्या अर्थ विभागाने निश्चित केलेल्या तरतुदीनुसार करण्यात आली आहे, असे गलगली यांनी सांगितले.