मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत नव्याने 417 नवे रुग्ण आढळून आले असून, 20 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजार 874 तर मृतांचा आकडा 270 वर पोहचला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 1 हजार 472 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मुंबईत कोरोना विषाणूचे नव्याने 417 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 307 रुग्ण गेल्या 24 तासात आढळून आले आहे. तर 110 रुग्ण 27 आणि 28 एप्रिल या दिवशी खासगी लॅबमध्ये करण्यात आलेल्या टेस्टमधून पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईत गेल्या 24 तासात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 16 जणांना दिर्घकालीन आजार होते. 20 मृतांमध्ये 14 पुरुष असून 6 महिला आहेत. मृत्यू झालेल्यापैकी 8 रुग्णांचे वय 60 वर्षाहून अधिक होते तर 12 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान आहे. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या आजारातून मुक्त झालेल्या 45 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत एकूण 1 हजार 472 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
15 हजार 954 जेष्ठ नागरिकांमध्ये ऑक्सिजनची कमी -
कोरोना कोव्हिड-19 चा धोका असू शकतो अशा ज्येष्ठ नागरिकांचा शोध पालिकेचा 400 टीमकडून घेतला जात आहे. गेल्या 3 दिवसात या टीमने 341 घरांमधील 15 हजार 954 जेष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात ज्यांच्या रक्तामध्ये प्राणवायूचे प्रमाण 95 टक्क्यांहून कमी त्यांना जवळच्या कोरोना केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.