मुंबई - कोरोनाचा मुंबईतील पहिला सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेली धारावी झोपडपट्टी आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणारे धारावीकर आता शेकडो मुंबईकरांना कोरोनामुक्त करण्यासाठी पुढे आले आहेत. कोरोनातून बऱ्या झालेल्या धारावीकरांना प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले होते. त्यानुसार आत्तापर्यंत 400 धारावीकर प्लाझ्मा देण्यास तयार झाले असल्याची माहिती जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. प्लाझ्मा देण्यास तयार असलेल्या धारावीकरांचे आजपासून स्क्रिनिंग आणि रक्ताची तपासणी करण्यास सुरुवात झाल्याचेही त्यांनी सांगितले.
धारावीतील 2 हजार 100 रुग्ण बरे झाले आहेत. 'धारावीकर बरे झाले आता त्यांनी इतरांनाही बरे करावे,' असे म्हणत महापालिकेने त्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काही जण स्वतःहून समोर आले तर, काहींना पालिकेने संपर्क करून प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार केले. पालिकेच्या या आवाहनाला कोरोनातून बऱ्या झालेल्या 400 रुग्णांनी प्रतिसाद देत प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही बऱ्या झालेल्या रुग्णांना संपर्क करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्लाझ्मा दान करणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल, असे दिघावकर यांनी सांगितले.
दरम्यान, आजपासून या 400 जणांची रक्ततपासणी धारावीतील कामराज स्कूल, 90 फिट रोड येथे सुरू झाली आहे. ज्यांना रक्तदाब, मधुमेह व इतर कोणते गंभीर आजार नाहीत आणि ज्यांचा प्लाझ्मा जुळेल अशांची निवड केली जाईल. त्यानंतर त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी सायन, केईएम आणि नायर रुग्णालयात पाठवण्यात येईल, असेही दिघावकर म्हणाले. धारावीकरांनी गेल्या तीन महिन्यात पाळलेली शिस्त आणि त्यांनी कोरोनावर केलेली मात, याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशात धारावीकरांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत इतरांनाही बरे करण्याचा निश्चय केला आहे. याचेही आता कौतुक होत आहे.