मुंबई - मुंबईतील फोर्ट भागातील भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख व जखमींना 50 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी केली. तसेच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करून इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था सरकारच्या वतीने करण्यात येईल, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.
काय आहे नेमकी घटना -
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील जीपीओसमोरील भानुशाली इमारत गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास कोसळली. मुंबईतील अतिधोकादायक इमारतीच्या यादीमधील ही एक इमारत आहे. या इमारतीच्या मालकाला ही इमारत पाडून नवीन बांधावी म्हणून म्हाडाच्या माध्यमातून पालिकेने परवानगी दिली होती. मात्र, मालकाने दुर्लक्ष केल्याने या इमारतीचा काही भाग गुरुवारी कोसळला.
या इमारतीमधून 12 जणांना गुरुवारी अग्निशमन दलाने शिडीद्वारे बाहेर काढले होते, तर 11 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. या सर्वांना जेजे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापैकी आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.