मुंबई - यंदा पावसाळ्यात समुद्राला २८ दिवस मोठी भरती असणार आहे. ५ दिवस ४.५० मीटरहून उंच लाटा उसळणार आहेत. तसेच १२ दिवस नीप टाईड असणार आहे. यामुळे मुंबईकरांचे या पावसाळ्यात हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समुद्राला मोठी भरती असताना नागरिकांनी समुद्राजवळ जाऊ नये असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
समुद्रात दरदिवशी भरती आणि ओहोटी असते. पावसाळ्यात मात्र पाऊस पडताना भरती असल्यास मोठ्या भरतीच्या दिवशी समुद्रात ४.५ मीटर उंचीच्या लाटा उसळतात. अशा वेळी मुसळधार पाऊस कोसळल्यास मुंबईतील सकल भागांमध्ये पाणी तुंबते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी अशा मोठ्या भरतीच्या दिवसांची यादी तयार करून त्या दिवशी महापालिकेतर्फे किनारपट्टीवर विशेष काळजी घेतली जाते. यावर्षी पावसाळ्यात समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीच्या तारखा पालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पालिकेने जाहीर केल्यानुसार २ जून रोजी ४.५४ मीटर, ३ जून ४.६९ मीटर, ४ जून ४.७८ मीटर, ५ जून ४.७९ मीटर, ६ जून ४.७४ मीटर, ७ जून ४.६० मीटर, ३१ जून ४.५३ मीटर, १ ऑगस्ट ४.७४ मीटर, २ ऑगस्ट ४.८७ मीटर, ३ ऑगस्ट ४.९० मीटर, ४ ऑगस्ट ४.८३ मीटर, ५ ऑगस्ट ४.६५ मीटर, २९ ऑगस्ट ४.५३ मीटर, ३० ऑगस्ट एकाच दिवशी ४.७७ मीटर व ४.९० मीटर अशा दोन वेळा, १ सप्टेंबर रोजी ४.९१ मीटर, २ सप्टेंबर ४.६७ मीटर, ३ सप्टेंबर ४.५४ मीटर, २७ सप्टेंबर ४.५१ मीटर, २८ सप्टेंबर ४.७२ मीटर, २९ सप्टेंबर ४.६३ मीटर, ३० सप्टेंबरला ४.८३ मीटरच्या लाटा उसळणार आहेत. या दिवसात मुंबईत मोठा पाऊस पडल्यास शहरात ठिकठिकाणी पाणी साचू शकते.
हे पाच दिवस अतिधोकादायक -
५ जूनला दुपारी १.३६ वाजता समुद्राला मोठी भरती असून त्यावेळी ४.६८ मिटर उंचीच्या, ५ जुलैला दुपारी २.०६ वाजता ४.७९ मिटर, ३ ऑगस्ट रोजी दुपारी १.४४ वाजता ४.९० मिटर उंचीच्या, ३१ ऑगस्टला दुपारी १२.३४ वाजता समुद्रात ४.९० मिटर उंचीच्या, तर १ सप्टेंबरला दुपारी १.१५ वाजता ४.९१ मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
नीप टाईड -
समुद्रात आलेली हायटाइड आणि लो टाइड यांच्यामध्ये अत्यंत कमी फरक असल्यास नीप टाइडची स्थिती निर्माण होते. यामध्ये ओहोटीची स्थिती ही भरतीसारखीच असते. अशा वेळी अतिवृष्टी झाल्यास फ्लड गेट बंद असल्यामुळे समुद्रात पाणी जाऊ शकत नसल्यामुळे पाणी तुंबण्याचा धोका निर्माण होतो. २९ ऑगस्ट २०१७ रोजी अशीच स्थिती निर्माण झाल्याने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. यावर्षी जून महिन्यात २५, २६, २७ तारीखला, जुलै महिन्यात २५, २६, २७ तरीखला आणि ऑगस्ट महिन्यात २४ आणि २५, सप्टेंबर महिन्यात ७, ८, २२, २३ या दिवशी नीप टाईड असणार आहे.