मुंबई - मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज मुंबईत कोरोनाच्या 2440 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा 9 हजारावर गेला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत आज (शुक्रवारी) कोरोनाचे 2440 नवे रुग्ण आढळून आले असून 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 37 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 31 पुरुष तर 11 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 9 हजार 934 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 9 हजार 011 वर पोहचला आहे. दरम्यान, आज 1358 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्य स्थितीत मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 72 हजार 036 वर गेला आहे.तर सध्या 28 हजार 472 सक्रिय रुग्ण आहेत.
तर, मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा हा कालावधी 66 दिवस तर सरासरी दर 1.06 टक्के आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिकेकडून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.
सध्या मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 667 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 10 हजार 637 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 11 लाख 44 हजार 744 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.