मुंबई - शहरात १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील शिक्षा भोगत असलेला आरोपी अब्दुल गनी तुर्क ( वय ६७) याचे नागपूरच्या जीएमसी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या स्फोटातील मुख्य आरोपी असलेल्या टायगर मेमनचा खास हस्तक म्हणून अब्दुल गनी तुर्क ओळखला जायचा. टायगर मेमन याचा हवालाचा व्यवसाय अब्दुलच सांभाळत होता.
१९९३ साली मुंबईतील सेंच्युरियन बाजारात बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. या स्फोटासाठी अब्दुल गनी तुर्क यानेच सेंच्युरियन बाजार येथे आरडीएक्स ठेवले होते. या ठिकाणी झालेल्या स्फोटांत ११३ जणांचा मृत्यू झाला होता, तर २०० हून अधिक जण जखमी झाले होते.
एवढेच नाही तर १९९३ साली मुंबईत वाहनांमध्ये आरडीएक्स ठेवून ते विविध परिसरात नेण्याची जवाबदारी अब्दुल गनी तुर्क याने पार पाडली होती. या घातपातासाठी लागणारे प्रशिक्षण अब्दुल गनी तुर्क यास पाकिस्तानात मिळाले होते.
अब्दुल गनी तुर्कवर टाडा अंतर्गत लावण्यात आलेले सर्व आरोप टाडा न्यायालयात सिद्ध झाल्याने त्यास मृत्युदंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती ज्याला अब्दुलकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. गेल्या काही दिवसांपासून अब्दुल गनी तुर्क आजारी होता. गुरुवारी त्याची तब्बेत अधिकच खालावल्याने त्यास नागपूरच्या जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.