मुंबई- राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू केली आहे. त्यानंतरही शहरात प्लास्टिकचा वापर सर्रासपणे केला जात आहे. त्यामुळे, पालिकेने १ मार्चपासून पुन्हा प्लास्टिक विरोधी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान पालिकेने १०२८ किलो प्लास्टिक जप्त केले असून ३ लाख ७५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
राज्य सरकारने जून २०१८ मध्ये प्लास्टिक बंदी लागू केली. त्याची अंमलबजावणी शहर महापालिकेकडून करण्यात आली. त्यानुसार ब्लू-स्कॉडची स्थापना करण्यात आली. ब्लू-स्कॉडने आतापर्यंत १६ लाख ३२४ दुकानांना भेटी दिल्या असून ८५ हजार ८४० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केला आहे. कारवाईदरम्यान ४ कोटी ६४ लाख ३० हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. ६६८ दुकानदारांनी दंड भरला नाही म्हणून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली आहे.
पालिकेने प्लास्टिक विरोधात आक्रमक भूमिका घेतली असली तरी शहरात आजही प्लास्टिकचा सर्रासपणे वापर केला जात आहे. येत्या मे महिन्यापर्यंत राज्य प्लास्टिकमुक्त करण्याची घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यानुसार काल १ मार्च पासून पालिकेने पुन्हा कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शहरातील ४ हजार ८१ दुकाने आणि आस्थापनांना पालिका अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. या भेटीमध्ये १ हजार २८.०९७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून ३ लाख ७५ हजार रुपयाचा दंड वसूल केला गेला आहे. एका दुकानदारांने दंड देण्यास नकार दिल्याने संबंधित दुकानदारावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
दुकाने व फेरीवाल्यांकडे प्लास्टिक जप्त करण्यात आले असून सर्वाधिक प्लास्टिकचा साठा मशीद बंदर येथे आढळल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्लास्टिकचा वापर करू नका महापालिकेकडून मंडईतील गाळेधारक, फेरीवाले आणि दुकानांसह मंगल कार्यालय, उपहारगृह आणि कार्यालयांमध्येही तपासणी केली जाते आहे. प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास कडक कारवाई करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
शहरातील नागरिक, व्यापारी, फेरीवाले यासह सर्वांनी बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी साठवणूक) वर बंदी घातलेली आहे. या अंतर्गत प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या (हॅण्डल असलेल्या व नसलेल्या), प्लास्टिकपासून बनविण्यात येणार्या व एकदाच वापरल्या जाणार्या टाकाऊ वस्तू जसे की ताट, कप्स, प्लेट्स, ग्लास, चमचे इत्यादी, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्या प्लास्टिकच्या वस्तू, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे कप किंवा पाऊच व सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठविण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिकचे वेष्टण यांच्या वापरावर बंदी घातलेली आहे. बंदी घालण्यात आलेले प्लास्टिक आढळल्यास प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसर्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये, तिसर्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड व ३ महिन्यांची कैद अशी शिक्षा आहे.
हेही वाचा- 'मी बाबू-कारकुंडा नाही तर संघाचा स्वयंसेवक'