लातूर - काँग्रेसचा बालेकिल्ला अशी लातूरची ओळख इतिहासजमा झाली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे २ लाख ७५ हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत. स्थानिक पातळीवर केलेले काम आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमाचे हे फळ असल्याची प्रतिक्रिया सुधाकर शृंगारे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
मतमोजणी दरम्यानच्या पहिल्या फेरीपासून भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे आघाडीवर होते. त्यांनी १ लाख मतमोजणी बाकी असताना २ लाख ६५ हजाराचे मताधिक्य घेतले आहे. यापूर्वी २०१४ साली डॉ. सुनील गायकवाड यांना २ लाख ५४ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करीत असताना पक्षश्रेष्ठींनी त्यांना लोकसभेचे तिकीट दिले. पक्षाने जबाबदारी वाढविल्यानंतर लातूरकरांनीही साथ दिली आहे.
सुधाकर शृंगारे म्हणाले, जनतेने मताच्या रुपाने भरभरून प्रेम दिलेले आहे. त्यामुळे आगामी काळातही लातूरकरांचा चौकीदार म्हणून काम करणार आहे. तळागळाच्या कार्यकर्त्यांचे काम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदार संघात घेतलेली सभा या सर्व गोष्टींचे फळ असल्याचे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीची मलाही धास्ती होती. मात्र प्रत्यक्षात त्याचा मताधिक्यावर परिणाम झाला नाही. मताधिक्य मिळाल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. मुलभूत प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे सुधाकर शृंगारे यांनी सांगितले. प्रचारादरम्यान लातूरकरांचा चौकीदार म्हणून काम करणार असल्याचे सांगत होतो. आज प्रत्यक्षात ती जबाबदारी येऊन ठेपली आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे आणि गुलबर्गा ते लातूर रेल्वे सुरू करण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने कामकाज करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकर्ते आणि पालकमंत्री संभाजी पाटील यांचे विजयामध्ये नियोजन निर्णायक ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वच विधानसभा मतदार संघातून मताधिक्य ही जमेची बाजू आहे. त्यामुळे जनतेचा चौकीदार म्हणूनच काम करणार हे नक्की असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.