लातूर - तीन दिवसांच्या ठिय्यानंतर वसंतराव नाईक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी आज विद्यार्थ्यांची भेट घेतली. वसतिगृहात मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि महाविद्यालयात प्रध्यापकांकडून होणारा त्रास कमी व्हावा. तसेच प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची बदली करावी, या त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. मात्र, बैठकीत तोडगा न निघाल्याने पुन्हा ठिय्या आंदोलन हे सुरूच राहणार आहे.
कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहात मूलभूत सोई-सुविधा मिळत नाहीत. घाणीचे साम्राज्य आणि पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहेत, तर प्रात्याक्षिकांच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अधिकचे काम करून घेतले जात आहे. अशा एक ना अनेक मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी तीन दिवसांपासून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या दिला होता. कुलगुरू यांच्यासमोरच आपले म्हणणे मांडणार असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती. अखेर तिसऱ्या दिवशी कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे लातुरात दाखल झाले होते. त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत बैठक घेतली. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा झाली. मात्र, प्राचार्य यांची तडकाफडकी बदली हा विषय कायम राहिल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन करण्यावर ठाम राहिले आहेत.
कुलगुरू यांनी म्हटल्याबरोबर बदली होत नाही. त्यासाठी प्रक्रिया गरजेची असते. त्यामुळे काही दिवसाचा वेळ लागणार आहे, असे कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्हणाले. तसेच त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे. त्यांनी आंदोलन मागे घेतले तरच पुढची कारवाई होईल, असेही कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी सांगितले आहे.