लातूर - जिल्ह्यात चार दिवसांपासून ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस होत आहे. मात्र, या पावसामुळे ना खरिपातील पिकांची वाढ होत आहे, ना पाणीसाठ्यात भर पडत आहे. उलटार्थी पिकांना रोगराईचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने सध्याची रिमझिम असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्यात 8 लाख हेक्टरहून अधिक खरीपाचे क्षेत्र आहे. मात्र, समाधानकारक पाऊस नसल्याने सरासरीपेक्षा अधिक होणारा पेरा यंदा मात्र 70 टक्क्यावरच झाला आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटले तरी सरासरीच्या तुलनेत केवळ 27 टक्के पाऊस झाला असल्याने लातूरकरांच्या समस्या कायम आहेत. 108 टँकरने पाणीपुरवठा आणि जलस्त्रोतांचे अधिग्रहण हे कायमच आहेत. गेल्या 4 दिवसांपासून रिमझिम पाऊस होत असला तरी याचा पिकांना फारसा फायदा होत नाही. पावसाळ्यातच शेतकऱ्यांना चाऱ्याची जुळवाजुळव करण्याची नामुष्की ओढवली आहे. चारा छावणी सुरू करण्याची मागणीही जिल्हा प्रशासनाकडे होत आहे. राज्यात पावसाची दमदार हजेरी असली तरी लातूर जिल्ह्यावर अवकृपा असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामळे पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. त्यामुळे हजारो रुपये खर्ची करून खरिपाची केलेली पेरणीतून किती उत्पादन मिळेल हा प्रश्न कायम आहे. उर्वरित काळात तरी दमदार पावसाने हजेरी लावावी आणि रब्बीला पोषक वातावरण व्हावे, असा आशावाद शेतकरी व्यक्त करत आहेत.