लातूर- लिंगायत समाजाचे धर्मगुरु डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा कालपासून (गुरुवार) समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. या अफवेमुळे हजारो भक्तांचा जनसमुदाय अहमदपूर येथील भक्ती स्थळासमोर जमा झाला होता. या अफवेमुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन झाले.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे महाराष्ट्र आणि आणि राज्याच्या बाहेरही अनुयायी आहेत. लिंगायत समाजासाठी त्यांचे मोठे योगदान असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. 105 वर्षीय डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची प्रकृती आजही ठणठणीत आहे. मात्र, गुरुवारी भक्ती निवास येथे काहीतरी क्षुल्लक घटना घडली. त्यानंतर डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे शुक्रवारी दिवसभर भक्तांना दर्शत देतील आणि शनिवारी जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती.
हेही वाचा- जेईई-नीट परीक्षांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सहा राज्यांकडून पुर्नविचार याचिका दाखल
आज सकाळपासून महाराजांचे वास्तव्य असलेल्या भक्ती निवास येथे हजारो भक्त जमा झाले. अफवा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने परजिल्ह्यतील भाविकही अहमदपूकडे रवाना झाले होते. मात्र, ही अफवा असल्याचे समजताच सर्वांनी काढता पाय घेतला. एका अफवेने भक्ती स्थळाच्या ठिकाणी जमा झालेल्या भक्तांकडून सोशल डिस्टन्सिंगबाबत काळजी घेतली नसल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील कपिळधारची यात्रा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे मोठे योगदान असते. वयाची शंभरी पार केल्यानंतरही त्यांचा भक्तांशी संवाद राहिलेला आहे.