लातूर - पंधरा दिवसांपूर्वी लातूर उपविभागीय कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे नागरिकांनी कार्यालयात येऊ नये, असा फलकच लटकवण्यात आला होता. तर मंगळवारी औसा येथील भारतीय स्टेट बँकेतील तब्बल चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मंगळवारी या शाखेतील व्यवहार ठप्प होते.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनाही याची लागण होत आहे. वाढत्या रुग्णाचा परिणाम शासकीय कार्यालयातील कामावरदेखील होताना पाहवयास मिळत आहे. नियमितप्रमाणे मंगळवारी सकाळी बँकेच्या समोर ग्राहक उभे राहिले होते. मात्र, 11 वाजले तरीही बँक खुली करण्यात आली नव्हती. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमतेचे वातावरण होते. असे असतानाच एका कर्मचाऱ्याने बँकेतील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यामुळे बँक बंद असल्याचे सांगितले.
यापूर्वी लातूर येथील उपविभागीय कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे 14 दिवस नागरिकांनी कार्यालयात येऊ नये अशाप्रकारचे सूचना फलक लावण्यात आले होते. तर, आता औसा येथील बँकेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे बँक किती दिवस बंद राहणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र, मंगळवारी कामानिमित्त बँकेकडे जाणाऱ्या ग्राहकांना रिकाम्या हाती परतावे लागले आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या प्रश्नी राज्य सरकार अपयशी; भाजपाचे लातुरात धरणे आंदोलन