लातूर - नैसर्गिक आपत्ती आणि महागाईमुळे राज्यात अनेक ठिकाणी बळीराजाने दिवाळी साजरी केली नाही. मात्र, राजकीय नेते सत्ता संघर्ष आणि खुर्चीच्या मागे लागले आहेत. संभाजी ब्रिगेडने याचा निषेध व्यक्त करत लातूर शहरातील शिवाजी चौकात वामन पुतळा दहन केला.
संभाजी ब्रिगेडने दिवाळी पाडव्याच्या दिवशी 'ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो', अशा घोषणा दिल्या. सोबतच हलगी वाजवत शहरातून मिरवणूक काढली. सध्या राज्यासह लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत राजकीय पुढाऱ्यांचे सत्तेच्या लालसेपोटी शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईकडे लक्षच नाही.
हेही वाचा - ...अखेर कुटुंबीयांच्या आदोलनानंतर अधिकारी निलंबीत, डीसीपी सौरभ त्रिपाठींचे आदेश
काढणीला आलेले खरीपाचे पीक परतीच्या पावसाने हिरावून नेले. याबाबत जिल्ह्यातील एकाही नेत्याने आवाज उठवला नाही. लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील आणि जिल्ह्याचे करते-धरते आम्हीच म्हणून मिरवणारे आमदार अमित देशमुख यांनीही शासन दरबारी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलेला नाही. शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी झाली नाही. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार मात्र सत्कार घेत मिरवत आहेत, असे आरोप संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अनिल जाधव यांनी केला.