लातूर - निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी गावाजवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा अपघात झाला होता. यावेळी पोलिसांनी कर्तव्य तर बजावलेच शिवाय सामाजिक बांधिलकी जोपासत किल्लारी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक यांनी रक्तदान करून एका अपघातग्रस्ताचे प्राण वाचविले आहेत. अमोल गुंडे असे या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आहे. गुंडे यांनी केलेल्या या कार्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ट्विट करुन कौतुक केले.
काय आहे घटना?
गुरुवारी सायंकाळी निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी जवळील मिरकल गावाजवळ एका दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा अपघात झाला. यामध्ये बालाजी सूर्यवंशी (56) हे गंभीररीत्या जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना 'ए निगेटिव्ह' रक्तगटाच्या रक्ताची आवश्यकता होती.
दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून या रक्ताची आवश्यकता असल्याचे उपनिरीक्षक अमोल गुंडे यांना समजले. त्यांनी विलंब न करता रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क केला आणि रक्तदान केले. त्यांच्या समयसुचकतेमुळे बालाजी सूर्यवंशी यांचे प्राण वाचले आहेत.
हेही वाचा - राहुल यांच्याकडे सातत्याची कमी; शरद पवारांनी व्यक्त केले मत
गृहमंत्र्यांकडून कौतुक -
उपनिरीक्षक अमोल गुंडे यांच्या सामाजिक कार्याची दखल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील घेतली. गुंडे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे ट्विट गृहमंत्री देशमुख यांनी केले.
'लव्ह लातूर' च्या ग्रुपमुळे मिळाली मदत -
सामाजिक कार्याच्या अनुषंगाने 'लव्ह लातूर' हा व्हाट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. अमोल गुंडे हेदेखील या ग्रुपचे सदस्य आहेत. या घटनेची माहिती गुंडे यांना मिळाली आणि त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना संपर्क केला.
रक्तदान हे असे दान आहे की, त्यामुळे रक्ताची नाती जुडली जातात. याच रक्तदानाचे आणि वेळेचे गांभीर्य ओळखून किल्लारी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल गुंडे यांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्ताला जीवदान मिळाले आहे. तर उपनिरीक्षक गुंडे यांच्या या कार्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.