लातूर - निलंग्यात झालेल्या खड्डेमय रस्त्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोखे आंदोलन केले. निलंगा-बिदर रस्त्यावरील खड्ड्यांत बेशरमाचे झाड लावून हे अनोखे आंदोलन करण्यात आले. मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून निलंगा नगरपालिका पाईपलाईन खोदकाम करत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. खोदकामामुळे शहरात धुळीचे लोट उडत आहेत. तसेच निलंगा-बिदर रस्त्यावर अनेक मोठे खड्डे पडून वाहनांचा अपघात होत आहे. शहरात वाहनांवरून फिरणे जिकरीचे होऊन विद्यार्थी शाळेत पायी जात आहेत. मात्र, नगरपालिकेला खड्डे बुजवण्यासाठी वेळही नाही. यामुळे खड्ड्यांमध्ये बेशरमाचे झाड लावून मनसेने नगरपालिकेला आता तरी जाग यावी यासाठी हे आंदोलन केले.
हेही वाचा - शिक्षकाने केली बदनामी.. विवाहित प्रियकरासह अल्पवयीन प्रेयसीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे विरोधात असताना याविषयी आंदोलने करायचे. आता सत्तेत असताना डोळे झाकून बसले आहेत का? असा प्रश्न मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. भिकाणे यांनी यावेळी केला. तसेच खराब रस्त्यांमुळे शहरात जीवघेणे अपघात होत आहेत. म्हणून नगरपालिकेने लवकरात लवकर खड्डे बुजवून रस्ते दुरुस्ती करावी, अन्यथा मनसे तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही मनसेने दिला आहे. या आंदोलनात तालुकाध्यक्ष सुरज पटेल, उपाध्यक्ष नजीर मुजावर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.