लातूर - लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान पार पडत आहे. मात्र, वाढत्या उन्हामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ३४ टक्के तर ४ वाजेपर्यंत ४५ टक्के मताची टक्केवारी होती. त्यामुळे ३ तासांमध्ये केवळ १२ टक्के मतदान झाले असल्याचे दिसत आहे.
लातुरकरांनी सकाळी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. त्यामुळे ग्रामीण भागात मतांचा टक्का वाढला होता. मात्र, दुपारी १ नंतर पारा ४० अंश सेल्सिअसवर गेल्याने मतदान केंद्रांवर कमालीचा शुकशुकाट पाहायला मिळाला. शिवाय काही ठिकाणी मतदारांचे नाव यादीत नसल्याने त्यांची तारांबळ उडाली. या मतदार संघात एकूण मतदार संख्या १८ लाख ८३ हजार ५३५ असून दुपारी साडे चारपर्यंत ८३ हजार ६०५ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. शिवाय सकाळच्या तुलनेत मतदान कमी झाले असून आता ५ वाजेनंतर पुन्हा मतदान प्रक्रियेला वेग येईल, अशी आशा आहे.
ज्या गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्याठिकाणी जिल्हाधिकारी जी श्रीकांत तसेच निवडणूक निर्णय अधिकारी हे नागरिकांची मनधरणी करत आहेत. मताचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन गावोगावी फिरत आहेत. त्यामुळे याचा काय परिणाम होईल हे ६ वाजल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.