लातूर - मोकाट कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने लातूरकर त्रस्त आहेत. कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने रस्त्याने मार्गस्थ होणेही अवघड होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्ली-बोळांचीही हीच अवस्था आहे. विशेष म्हणजे शहरातील मोकाट कुत्र्यांचा ना कधी सर्व्हे झाला ना कधी त्यांची नसबंदी. महानगरपालिका नागरिकांच्या समस्यांबाबत गंभीर नाही तिथे कुत्र्यांचे काय? असा सवाल आता लातूरकर उपस्थित करू लागले आहेत.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त हा विषय तसा मूलभूत समस्यांमध्ये येत नाही. पण सध्याची परिस्थिती पहिली तर लातूरकरांच्यादृष्टीने त्याहून अधिक महत्त्वाचा विषय नाही. सध्या शहरात लॉकडाऊन असल्याने रस्ते निर्मनुष्य आहेत. पण मोकाट कुत्र्यांची वर्दळ मात्र कायम आहे. हॉटेल सुरू नसल्याने या कुत्र्यांची उपासमार होत आहे. परिणामी ही कुत्री आता सैरभैर झाली असून गल्ली बोळातील घरात शिरतात. लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. शिवाय दुचाकी-चारचाकी वाहनांचा पाठलागही कुत्री करत असल्याने अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेक संघटना आणि पदाधिकाऱ्यांनी मनपाकडे केली होती. मात्र, आत्तापर्यंत शहरातील कुत्र्यांचा ना सर्व्हे झाला आहे ना कधी त्यांची नसबंदी झाली. त्यामुळे शहरात किती मोकाट कुत्री आहेत? याची माहिती देखील मनपाकडे उपलब्ध नाही. याबाबत मनपाचे स्वच्छता निरीक्षक कलीम शेख यांना विचारणा केली असता गेल्या 4 वर्षांपासून कोणता सर्व्हे झालेला नाही. मी पदभार स्वीकारून केवळ तीन महिने झाले आहेत. सर्व यंत्रणा कोरोनामध्ये व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉग व्हॅन धुळखात पडून, तर कोंडवाड्यात कचऱ्याची साठवणूक -
शहरातील मोकाट कुत्रे पकडून त्यांची नसबंदी करण्यासाठी तयार केलेली डॉग व्हॅन सध्या गांधी चौकातील पाण्याच्या टाकीखाली धुळखात पडली आहे. त्यावर आता विविध वेलींचे साम्राज्य फोफावले आहे. मोकाट जनावरे आणि कुत्री पकडून ठेवण्यासाठी मनपाच्या समोरच एक पत्र्याचे शेड करण्यात आले होते. सध्या याची मोडतोड करून या ठिकाणी कचरा संकलन केले जात आहे. याचा त्रास लातूरकरांना सहन करावा लागत आहे.