लातूर - संपूर्ण राज्यात फ्रन्टलाइन वर्करसाठी पहिल्या टप्प्यात कोविड-19 लसीकरण मोहीम राबवली जात आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस व इतर 17 हजार 500 कर्मचाऱ्यांची नाव नोंदणी झाली आहे.
अगोदर होणार ड्राय रन -
लसीकरणासाठी पूर्वतयारी म्हणून लातूर जिल्ह्यातील पाच ठिकाणी शुक्रवारी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजता या कालावधीत ड्राय रन घेतली जाणार आहे. ही ड्राय रन यशस्वी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले. जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यात ज्या ठिकाणी ड्राय रन होणार आहे त्याठिकाणी आरोग्य यंत्रणेने योग्य ती दक्षता घ्यावी. नियोजित वेळेत कोरोना प्रतिबंधासाठी आयोजित लसीकरणासाठी ऑनलाइनद्वारे नोंदणी झालेल्या काही लोकांना ड्राय रनमध्ये समावेश करून घ्यावा, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सूचित केले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आयोजित ड्राय रनची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पाच ठिकाणी होणार ड्राय रन -
आज (8 जानेवारी) ड्राय रनच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, उपजिल्हा रुग्णालय उदगीर, प्राथमिक आरोग्य केंद्र भातागळी, ग्रामीण रुग्णालय मुरुड व शहरी आरोग्य केंद्र मंठाळे ही पाच ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. सकाळी आठ ते दुपारी दोन या कालावधीत ड्राय रन आयोजित केलेला आहे. या पाच केंद्रावर नोंदणी केलेल्या आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी प्रत्येकी 25 लोकांना बोलावून घेऊन रंगीत तालीम केली जाणार आहे.
या ड्राय रनद्वारे कोरोना प्रतिबंधासाठी राबवण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम होणार आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी को-इन हे सॉफ्टवेअर वापरण्यात आले आहे. याद्वारे या सर्व कार्यप्रणालीची माहिती घेतली जाणार आहे. प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबवताना कोणतीही अडचण येणार नाही, याबाबत दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती डॉ. हरिदास यांनी दिली.