लातूर - भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारात सर्वच भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र, शहरातील एका मॉलमध्ये हीच भाजी घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. त्याला कारणही तसेच होते. मॉलमध्ये बटाटे, टोमॅटो आणि कांदे हे प्रतिकिलो 5 रुपये दराने विक्रीला होते. मग काय मॉलची पायरीही न चढलेले ग्राहक आज रांगा लावून भाजी विकत घेत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर भाजीपाल्याची आवक घटल्याने कांदा 40 रुपये बटाटा 40 तर टोमॅटोची विक्री 30 रुपये किलोने होत आहे. मात्र, एका मॉलमध्ये आज फूड डे निमित्ताने कमी दरात याची विक्री करण्यात आली. त्यामुळे वाढत्या महागाईत ग्राहकांची मात्र चांदी झाली. सकाळी 7 वाजल्यापासून या विक्रीला सुरवात झाली ती रात्री 9 पर्यंत ग्राहकांची गर्दी होती. शिवाय जे ग्राहक नियमित आहेत त्यांना मॅसेज करून याची माहिती देण्यात आली होती. अट एकच होती ती म्हणजे एका ग्राहकाने 5 किलो एवढीच खरेदी करण्याची. मॉलच्या या एका दिवसाच्या ऑफरने ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.