लातूर - रशिया-युक्रेन युद्धाचे ( Ukraine Russia ) परिणाम दिवसेंदिवस समोर येताना दिसत आहेत. मागील सहा महिन्यांपुर्वी भारतातून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षांविनाच भारतात परतावे लागले आहे. आता या युक्रेन रिटर्न विद्यार्थ्यांना नीट (NEET) परीक्षा बंधनकारक आहे. त्याशिवाय भारतात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळणार नसल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी लातूर येथे माध्यमांशी ( Minister of Medical Education about Ukraine Return Student ) बोलताना सांगितले आहे. ते सध्या लातुर दौऱ्यावर आहेत.
'वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नीट परीक्षा द्यावी लागेल'
देशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नीट परीक्षा द्यावी लागते. ज्या विद्यार्थ्यांनी युक्रेनमध्ये जाऊन वैद्यकीय प्रवेश घेतला आणि सहा महिन्यांतच त्यांना परत यावे लागले. अशा विद्यार्थ्यांना एक संधी पुन्हा उपलब्ध आहे. त्यांना पुन्हा 'नीट' ही वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असणारी प्रवेश द्यावी लागेल. त्यानंतरच देशात कुठेही वैद्यकीय शिक्षण घेता येईल.
'कायद्याच्या बाहेर जाऊन काही करणे योग्य नाही'
वैद्यकीय शिक्षण हे व्यावसायिक शिक्षण असून मनुष्याशी निगडित असल्याने त्यासंबंधीचे कायदे आहेत. त्या कायद्याच्या बाहेर जाऊन काही करणे योग्य नाही, असे मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांना आता भारतात किंवा राज्यात वैद्यकीय शिक्षण घ्यायचे असल्यास 'नीट' परीक्षा बंधनकारक आहे, हे मात्र निश्चित आहे.