लातूर - काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची होत असलेली घुसखोरी थांबविण्याची संधी लोकसभेच्या माध्यमातून आमदार अमित देशमुख यांना होती. मात्र, निकालानंतर भाजपला मिळालेली मतांची आकडेवारी पाहून जिल्ह्यात काँग्रेसचा पाय आणखीन खोलात गेल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे २०१४ साली निवडणुकीत झालेला पराभव हा पक्षांच्या चुकीच्या धोरणामुळे आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांसोबत असलेला विसंवाद यामुळे झाल्याचे स्पष्ट होत आहे.
लातुरात भाजपकडून सुधाकर श्रृंगारे तर, काँग्रेसकडून मच्छिंद्र कामत यांच्यात प्रमुख लढत होती. परंतु, ही लढत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. जिल्ह्यात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसची पीछेहाट झाली असून भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. ६ विधानसभा मतदार संघांपैकी ३ जागांवर भाजपचे आणि ३ जागांवर काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, या लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसची चिंता वाढली आहे. कारण, काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या लातूर शहर, लातूर ग्रामीण आणि औसा या मतदार संघात भाजपलाच मताधिक्य मिळाले आहे.
आगामी विधानसभेत निकाल काय लागणार याचे आतापासूनच अंदाज बांधले जात आहेत. वंचित बहुजन आघाडीने जवळपास १ लाखाहून अधिक मते घेतली असल्याने काँग्रेससाठी ही बाब डोकेदुखीची ठरत आहे. विधानसभा निवडणुकीला ६ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे या कालावधीत आमदार अमित देशमुख कोणती धोरणे आणि भूमिकेच्या आधारे मतदारांना मतदानाचे आव्हान करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.