लातूर - सत्ता परिवर्तन होताच राज्य पातळीवरील अनेक कामांना स्थगिती तसेच कामाचे स्वरूप बदलण्यात आले होते. त्याप्रमाणेच भाजप सरकारच्या काळात जिल्ह्यात झालेल्या कामाबद्दल पालकमंत्री अमित देशमुख यांनी सवाल उपस्थित केला आहे. गतवर्षी मंजूर झालेल्या निधपैकी केवळ 38 टक्के निधी खर्ची झाला असेल तर हे गंभीर आहे. त्यामुळे गत पाच वर्षात किती निधी अखर्चित राहिला तसेच त्याचे काय झाले, याची चौकशी करावी लागणार असल्याचे सांगत त्यांनी माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या काळातील कामावर प्रश्न उपस्थित केला आहे.
पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवारी) पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी गत वर्षभरात झालेल्या विकास कामाचा आढावा घेऊन आगामी वर्षभरात जिल्हा प्रशासनाचे नियोजन काय असणार आहे यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी 2018-19 या वर्षात आराखड्यानुसार मंजूर झालेल्या निधींपैकी केवळ 38 टक्केच निधी झाला असल्याचे समोर आले. त्यामुळे असे चित्र असेल तर गेल्या पाच वर्षात काय स्थिती राहिली असेल, असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्ष संभाजी पाटील निलंगेकर पालकमंत्री असतानाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला.
हेही वाचा - 'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला पुण्यात संमिश्र प्रतिसाद; दांडेकर पुलावरील आंदोलकांना पोलिसांनी पांगवले
या अखर्चित निधीमुळेच आगामी काळात कमी निधी मिळेल, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केला. या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला खासदार सुधाकर शृंगारे, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धीरज देशमुख, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर यांच्यासह सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.