लातूर : दिवसेंदिवस लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूंचाही आकडा वाढत आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लातूर शहरातील एक तर औसा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. तर शुक्रवारी 3 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत पर्यंत कोरोना उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही 39 एवढी झाली आहे. तर एकूण रुग्णांची संख्या ही 173 वर गेली आहे. त्यापैकी 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गुरुवारच्या तीन प्रलंबित अहवालापैकी दोघांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहेत. तर बाभळगाव येथे कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना कोविड-१९ व्यतिरिक्त इतर आजारही होते, शिवाय हे सर्व रुग्ण वयोवृद्ध होते. असे असले, तरी दिवसाकाठी वाढत असलेली रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब आहे.
शुक्रवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी औसा तालुक्यातील स्त्री रुग्ण या मुंबईहून प्रवास करून आल्या होत्या. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले असता गुरुवारी रात्री 10 च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुसरे रुग्ण हे 70 वर्षीय होते. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच हृदयविकाराचा आजार होता. पाच वर्षापूर्वी त्यांचे बायपास ऑपरेशनही झाले होते. शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असतानाही दगावणाऱ्या रुग्णाचीही संख्या वाढत असताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील प्रमुख शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : विद्युत तारेचा शाॅक लागून सख्ख्या भावांचा मृत्यू; जळकोट तालुक्यातील घटना