निलंगा(लातूर) - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक आंतर ठेवून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार खरीप हंगामासाठी त्यांच्या बांधावर रासायनिक खते व बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
खरीप हंगाम २०२० साठी २४ एप्रिलला पालकमंत्री, खासदार, आमदार व अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. परंतु, त्यात एकमेकांशी व्यवस्थित सुसंवाद होऊ शकला नसल्याने नाराजी पत्रात नमूद केले आहे. तसेच खरीप हंगाम तोंडावर आल्याने तात्काळ शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रासायनिक खते व बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत योग्य कारवाई करावी. त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील कांही तालुके इतर राज्याच्या सीमेवर असल्याने मोठ्या प्रमाणात बोगस खते व बियाणे यांचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाला कारवाईच्या सूचना द्याव्यात. निलंगा मतदारसंघातून तेरणा व मांजरा नदी वाहत असल्याने येथील जमिनी चांगल्या आहेत. त्यासाठी ७१ हजार ९६० मेट्रिक टन रासायनिक खते व ८६ हजार ७६६ क्विंटल दर्जेदार बियाणे योग्य दरात शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध करून द्यावेत. त्याचबरोबर जिल्ह्यात तूर व हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करत लातूर जिल्हा लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अथक परिश्रमातून कोरोनामुक्त झाल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच यापुढे कोरोना विषाणूचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बाहेरुन येणाऱ्या नागरिकांचे नियमानुसार क्वारंटाईन करण्याची मागणी या पत्रात केली आहे.