लातूर - सध्या भारत-चीन या दोन देशात डोकलाम मुद्द्यामुळे संबंध ताणले गेले आहेत. त्याच परिसरात कर्तव्य बजावीत असताना नागनाथ अभंग लोभे (वय ३५ ) या जवानाला वीरमरण आले. ते लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील उमरगा (हा) गावाचे रहिवाशी होते. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
पाच जवानांना आलं वीरमरण
देशाच्या सीमावर्ती भागात सद्या बर्फवृष्टी होत आहे. यादरम्यान, सियाचीन परिसरात नागनाथ लोभे व त्यांचे इतर चार सहकारी हे वाहनातून गस्त घालत होते. रस्त्यावर बर्फ पसरल्याने, निसरडी वाटेमुळे त्यांचे गाडीवरिल नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दरीत कोसळली. यामध्ये पाचही जवानांना वीरमरण आले आहे.
यात निलंगा तालुक्यातील उमरगा (हा) या छोट्याश्या गावातून गेलेले नागनाथ यांचा समावेश आहे. नवनाथ मागील अनेक वर्षांपासून देशाची सेवा करीत होते. नियमीतपणे या सीमावर्ती भागात गस्त घालत असताना ही दुर्घटना घडली.
उमरगा गावावर शोककळा
नागनाथ यांचे पार्थिव उमरगा या त्यांच्या मूळगावी आणले जाणार आहे. मात्र ते कधीपर्यंत येईल, हे अद्यापही अधिकृत सांगण्यात आलेले नाही. उमरगा गावात ही बातमी कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. नवनाथ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. दरम्यान, 15 दिवसांपूर्वीच निलंगा तालुक्यातीलच एक जवानाला वीरमरण आले होते.
हेही वाचा - सत्ताधारी-विरोधकांची मंजुरी, तरीही दिवंगत विलासरावांचे रखडले स्मृतीभवन
हेही वाचा - पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या; औसा तालुक्यातील धक्कादायक घटना