लातूर - विजेच्या धक्क्याने एक वानर लातूर जिल्ह्यतील आनंदवाडी येथे मृत्युमुखी पडले होते. वानराच्या मृत्युमुळे आनंदवाडीतील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. दिवसभर गावातील एकही चूल पेटली नाही. वानरावर अंत्यसंस्कार करुन ग्रामस्थांनी त्याला निरोप दिला. वानराविषयी संवेदनशीलता दाखविल्याने आनंदवाडीकर जिल्ह्यात सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत.
अहमदपूर तालुक्यातील आनंदवाडी हे एक ते दीड हजार लोकवस्ती असलेले गाव. शनिवारी पाण्याच्या शोधात गाव शिवारात घुसलेल्या एका वानराचा विज तारेच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने आनंदवाडीचे वातावरण शोकाकुल झाले. येथील ग्रामस्थांनी त्या मृत वानराला बैलगाडीत घालून थेट गावातील हनुमान मंदीर परिसरात आणले. शनिवार आणि हनुमानाचे वंशज समजले जाणाऱ्या वानराचा मृत्यू यामुळे वानराला कुठे टाकून न देता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला.
अंत्यदर्शनासाठी वानराचा मृतदेह मारुती मंदिराच्या समोर ठेवण्यात आले. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने अंत्यदर्शन घेतले. भजनी मंडळींनी भजन करुन वानराला आदरांजली वाहिली. त्यानंतर मारुती मंदिराच्या परिसरात खड्डा खोदून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.