लातूर - जिल्ह्यातील गाधवड ग्रामस्थांनी पिकविमा मिळण्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले. प्रश्न मार्गी न लागल्यास येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. ग्रामस्थांच्या या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही पाठिंबा होता.
जिल्ह्यातील शेतकरी भर पावसाळ्यात दुष्काळाशी सामना करत आहे. त्यातच गतवर्षीच्या खरीप पीक विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली नाही. यंदाचाही खरीप विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आज लातूर-बार्शी रोडवरील गाधवड येथील चौकामध्ये रास्तारोको करण्यात आला होता. छावणी नाहीतर जिल्हा प्रशासनाने दावणीला चारा द्यावा, पावसाअभावी खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई द्यावी, गतवर्षीची पीकविमा रक्कम त्वरित खात्यावर जमा करावी. तसेच चालू खरीप पीक विमाही देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सत्तार पटेल यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
शेतकरी बैलगाडी, जनावरे घेऊन या रास्तारोकोमध्ये सहभागी झाले होते. तब्बल दोन हे आंदोलन चालले. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर तांदुळजा मंडळातील सर्व गावातील शेतकरी बहिष्कार टाकतील. शिवाय नेतेमंडळीला गावबंदी करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी उपस्थित होते.