लातूर - सततची नापिकी आणि कर्जाच्या विवंचनेत असलेल्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना चाकूर तालुक्यातील जाणवळ गावात घडली आहे. विनायक भिवाजी चंद्रे(वय 54, जाणवळ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
विनायक यांना डोंगरमाथ्यावर शेती आहे. मात्र, गेल्या 4 वर्षापासून सततची नापिकी आणि दुष्काळ यामळे विनायक कर्जबाजारी झाले होते. असे असताना यावर्षीही पावसाने उघड दिल्यामुळे खरीपाची पेरणी झाली नाही. त्यात कर्जाचा वाढत चाललेला डोंगर पाहून विनायक आणखी निराश झाले.
तसेच मागील वर्षी वडवळ नागनाथ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर होऊनही शासनाची व विमा कंपनीची कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत झाली नाही. त्यामुळे शासनाची व विमा कंपनीची मदत मिळणार की नाही, यात शंकाच आहे. यात कर्जाचा डोंगर आणखी वाढणार असल्याने, निराश होऊन राहत्या घरातच विनायक चंद्रे यांनी आपली जीवन यात्रा संपवली. याप्रकरणी चाकूर पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केल्यानंतर जानवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.