लातूर - भाजपच्या लोकसभा मतदार संघासाठी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर खासदार सुनील गायकवाड यांच्याबद्दल विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, पक्षश्रेष्ठीचे आदेशच आपल्यासाठी सर्वकाही असून त्यांच्या आदेशानेच भविष्यातही काम करणार असल्याचे सुनील गायकवाड यांनी सांगितले आहे.
भाजपकडून आज १६ उमेदवरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यापैकी २ ठिकाणी बदल करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असल्याने खासदार सुनील गायकवाड यांचा पत्ताही कट झाला आहे. त्यामुळे अवघ्या काही वेळातच ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगू लागली होती. मात्र, सुनील गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील ते जबाबदारी पार पडणार असल्याचे सांगितले.
मात्र, या सर्व घडामोडीत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपले मनसुभे साद्य केल्याची चर्चा विविध अंगाने सुरू आहे. पक्षाने आजतागायत दोनदा खासदारकीच्या निवडणूकीला संधी दिली होती. आता पक्षाचा जो आदेश प्राप्त होईल त्यानुसार काम करणार असल्याचे मत सुनील गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.