लातूर - वैद्यकीय क्षेत्रात पुढचे पाऊल टाकत लातूरच्या डॉक्टरांनी नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वैद्यकीय महाविद्यातील अधिकाऱ्यांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे या डॉक्टरांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
रुग्णालयातील अत्याधुनिक लेसर प्रणालीद्वारे प्रोटेस्ट ग्रंथींची शस्त्रक्रिया करणारे राज्यातील हे पहिलेच शासकीय रुग्णालय ठरले आहे. शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे डॉ. अनिल मुंढे यांनी ग्रीन लाईट लेसर प्रणालीद्वारे पाच रुग्णांवर ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली आहे.
या प्रकारची अत्याधुनिक शस्त्रक्रिया राज्यातील दोन ते तीन खासगी रुग्णालयात केली जाते. तसेच यासाठी होणारा खर्च सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. परंतु, आता सर्वसामान्य रुग्णांनाही याचा लाभ घेता येणार असल्याचे डॉ. अनिल मुंढे यांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर दोन ते तीन दिवसांत रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात येते, ते म्हणाले. यामुळे रक्ताचे दोष असणाऱ्या रुग्णांसाठी तसेच ज्यांना रक्तदाब, हृदयरोगासारखे विकार आहेत, त्यांच्यासाठी ही लेसर प्रणाली वरदान ठरणार आहे.
इतर ठिकाणी खर्चीक असलेल्या या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांनी शासकीय रुग्णालयाचा आधार घेण्याचे आवाहन अधिष्ठता डॉ. गिरीष ठाकूर, उप अधिष्ठता डॉ. मंगेश सेलुकर, डॉ. उमेश लाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी केले आहे.