लातुर - शासकीय सर्वोपचार रुग्णालय परिसरातील पाण्याच्या हौदात आढळून आलेल्या तरुणाच्या मृत्यूचे गूढ 4 दिवसानंतरही कायम आहे. शवविच्छेदनंतरही तरुणाची ओळख पटली नसल्याने अद्यापपर्यंत अंत्यसंस्कारही करण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे कोणी नातेवाईकही समोर आलेले नाहीत.
त्यामुळे व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तर 4 उत्तेरीय नमुने वैज्ञानिक प्रयोगशाळा औरंगाबाद येथे 1, नांदेडमध्ये 2 तर 1 नमुना लातुर येथील ईस्टो पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. हे सर्व अहवाल प्राप्त झाल्यावरच हा घात आहे की अपघात हे स्पष्ट होणार आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागाच्या मागच्या बाजूस असलेल्या पाण्याच्या हौदात या 40 वर्षीय नागरिकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. साफसफाई करणाऱ्या महिलांना त्याची दुर्गंधी आल्याने ही घटना समोर आली होती. आता 4 दिवस उलटूनही नेमका मृतदेह कोणाचा? हा घात आहे की अपघात असे सवाल उपस्थित होत आहेत. यासंबंधी गांधी चौक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष गोसावी अधिक तपास करत आहेत.