लातूर - परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांचा रोष वाढू नये, म्हणून गेल्या 2 दिवसांपासून नवनिर्वाचित आमदारांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. शिवाय सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
परतीच्या पावसाने अंतिम टप्प्यात असलेल्या खरिपाचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. खरिपात सोयाबीन हे प्रमुख पीक असून सुरवातीला पाण्याअभावी या पिकाला धोका निर्माण झाला होता. तर आता ऐन काढणीच्या प्रसंगी अतिवृष्टी झाल्याने सर्व पिके पाण्यात गेली आहेत. 2 दिवसांपूर्वी औसा मतदारसंघात आमदार अभिमन्यू पवार यांनी पिकांची पाहणी करून जिल्हाधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक घेतली. तर आज पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदारसंघातील पिकांची पाहणी केली.
हेही वाचा - पावसाची अवकृपा : लातुरात सोयाबीन चिखलात अन् शेतकरी संकटात
निसर्गाचा लहरीपणा आणि प्रशासनाकडून मदतीसाठीचा आखडता हात यामुळे जगावे कसे? असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला. यंदा प्रतिकूल परिस्थितीमध्येही विक्रमी उत्पादन होणार, असा आशावाद होता. मात्र, ऐन वेळी परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आणि होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे 100 टक्के नुकसान झाले असून मदतही 100 टक्केच मिळणार असल्याचे सांगत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. तर मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार पीकपाहणीला सुरुवात केली आहे.
हेही वाचा - व्हिडीओ व्हायरल : बळीराजाच्या 'त्या' आरोळीनं राजकीय पक्षांना पाझर फुटेल का?
शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तर दुसरीकडे नवनिर्वाचित आमदार धीरज देशमुख यांनीही लातूर ग्रामीण मतदारसंघातील पिकांची पहाणी केली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून संबंधित अधिकाऱ्यांना मदत करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. एकीकडे सत्तास्थापनेकडे राज्याचे लक्ष लागले असले, तरी स्थानिक पातळीवर नाराजी निर्माण होऊ नये म्हणून का होईना लोकप्रतिनिधी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत आहेत.