लातूर- जिल्ह्यात कडाक्याची थंडी नसली तरी सोमवारी सकाळी दाट धुक्यात लातूरकर हरवल्याचे पहावयास मिळाले. महिन्याभरापूर्वीही अशाच वातारणाचा सामना नागरिकांना करावा लागला होता. त्यामुळे, बहरत आलेल्या पिकांवर या बदलत्या वातावरणाचा काही दुष्परिणाम होणार का याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे.
सोमवारी पहाटे सकाळी ८ नंतर दाट धुके पडण्यास सुरवात झाली होती. मात्र, ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा जाणवत नव्हता. या अल्हादायक वातारणाचा मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनी आनंद लूटला. यापूर्वीही अशा प्रकारचे धुके सबंध जिल्ह्यात पडले होते. त्यावेळी रब्बीतील पिके प्राथमिक अवस्थेत असल्याने रोगराईचा धोका वाढला होता. मात्र, सध्या रब्बीतील पिके बहरत असून या वातावरणाचा काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.
अचानक पडलेले धुके मोबाईलमध्ये टिपण्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गर्दी केली होती. वातावरणात गारवा नाही परंतु, ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील हरभरा, ज्वारी, गहू या मुख्य पिकांवर किडीचा प्रदुर्भाव निर्माण होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे, धुक्याने अल्हादायक वातावरण झाले असले तरी शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी भीतीचे वातावरण आहे.
हेही वाचा- पत्नीला तब्बल आठ महिन्यांनी मिळाला पतीचा मृतदेह; सौदी अरेबियात झाला होता मृत्यू