लातूर - एखाद्या गोष्टीत वेगळेपण हे लातूर पॅटर्नचे वैशिष्ट्य राहिले आहे. एखाद्याकडे अधिकचे असले तर ते गरजवंतांना मिळावे या साध्या हेतूने लातूर येथे सुरू करण्यात आलेली कपडा बँक आता 5 वर्षाची झाली आहे. या काळात तब्बल 6 लाख गरजवंतांना याचा लाभ झाला आहे. तर मदतीचा ओघ अजुनही कायम आहे. काळाच्या ओघात एखाद्या गोष्टीमध्ये सहसा सातत्य राहत नाही. मध्यंतरी माणुसकीची भिंत म्हणून उदयास आलेली संकल्पना बंद पडली आहे. पण लातूरमधील सामाजिक कार्य करणाऱ्यांनी सुरू केलेली कपडा बँक अद्यपही सुरू आहे.
अनाथ मुलांना ब्लँकेटचे वाटप -
सर्वसामान्य ते उच्चभ्रू नागरिकांकडे जुने कपडे असतातच पण त्याचा वापर होत नाही तर दुसरीकडे कपड्यांविना असणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. हाच फरक ओळखून लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चैकात कपडा बँक सुरू करण्यात आली होती. बँकेतील व्यवहार तर सुरळीत होतेच पण थंडीच्या दिवसात बेघर आणि रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्यांचे काय? हा सवाल कायम होता. म्हणूनच शहरातील गल्लीबोळात रिकाम्या जागेचा आडोसा घेऊन रात्र काढणाऱ्या नागरिकांसाठी ब्लॅंकेटचे वाटप केले जात आहे. एवढेच नाही तर शहरालगतच्या सामाजिक संस्थामध्येही ही मदत पोहचती केली जात आहे. यंदाच्या हिवाळ्याची सुरुवात औसा तालुक्यातील हासेगाव येथील सेवालायापासून झाली आहे. येथे तब्बल 84 अनाथ मुलांना ब्लॅंकेटचे वाटप झाले आहे.
कपडा बँकेच्या 'या' आहेत नियम अटी -
ज्यांच्याकडे जास्त आणि चांगल्या स्थितीतील कपडे आहेत. ते नागरिक याठिकाणी कपडे देऊ शकतात. पण यासाठी बँकेने काही नियम अटी घालून दिलेल्या आहेत. बँकेत कपडे जमा करताना ते जुने असले तरी चालतील पण सुस्थितीतील असणे आवश्यक आहे. शिवाय स्वच्छ धुऊन व इस्त्री करून जमा करणे आवश्यक आहे. जेणेकरून घेणाऱ्याचा आत्मसन्मान राखला जाईल. कपडे घेऊन जाणाऱ्याच्या नावाची नोंद केली जाते. पण त्याचे नाव समोर येऊ नये याचीही खबरदारी घेतली जाते.
मदत केलेल्या साड्यातून उभारले व्यवसाय -
जुने कपडे तसेच पडून राहतात. पण कपडा बँकेच्या माध्यमातून देऊ केलेल्या साड्यांतून काही संस्थांनी व्यवसाय उभे केले आहेत. सेवालयात दिलेल्या साड्यातून येथील महिला आणि मुलींनी पर्स, पायपुसनी, पिशव्या बनवत आहेत. यामधून संस्थेला उत्पन्न होत आहे.