निलंगा (लातूर) - जेवरीच्या सरपंचांच्या सतर्कतेमुळे बालविवाह प्रतिबंधक कायदा समिती, पोलीस प्रशासनास बालविवाह रोखण्यात यश आले आहे. यामुळे सरपंचाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निलंगा तालुक्यातील जेवरी येथे शेतमजुरी करण्यासाठी आलेल्या मजुराच्या 14 वर्षीय मुलीचा बालविवाह तोरंबा येथील 60 वर्षीय व्यक्तीसोबत म्हणजेच संबंधितांच्या थोरल्या जावयासोबत होणार होता. ही माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते बालाजी तारे यांनी तत्काळ पोलीस प्रशासनास दिली व सर्व गावकऱ्यांना सतर्क केले.
दरम्यान, बालविवाह प्रतिबंधक समितीचे सदस्य सचिन बिद्री यांनी लातूर प्रशासनाला ही माहिती दिली. सरपंच संजय कुलकर्णी, ग्रामसेवक एच. टी. ढोले, पोलीस जमादार शिंदे, अंगणवाडी पर्यवेक्षिका ठेंगील, पोलीस पाटील जेवळे, सर्व अंगणवाडी सेविका व काही गावकऱ्यांनी संबंधिताचे घर गाठले.
यावेळी त्यांनी विचारणा केली असता आम्ही असे काहीही करणार नाही. आमची पहिली मुलगी त्याच व्यक्तीला दिली होती. तिचा सर्पदंशाने मृत्यू झाला, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. पोलीस व बालविवाह प्रतिबंधक समितीने त्यांची समजूत काढल्यानंतर पुन्हा असे करणार नसल्याचे त्यांनी कबूल केले. तसे त्यांच्याकडून सरपंचांनी लिहूनही घेतले. याप्रकरणी 60 वर्षांच्या नवरदेवाला उस्मानाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.