लातूर - मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर समाजाच्यावतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे. तसेच 11 ऑक्टोबरला होणाऱ्या स्पर्धा परीक्षेला घेऊन वेगवेगळे मत समाजबांधवातून समोर येत आहे. आरक्षणाचा लढा राज्य सरकारशी आहे, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी नाही. त्यामुळे परिश्रम घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा व्हायलाच हव्यात. वेळप्रसंगी या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना संरक्षण देऊ पण परीक्षांपासून दूर ठेऊ देणार नसल्याची भूमिका छावा संघटनेने घेतल्याचे संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
11 ऑक्टोबर रोजी राज्यात स्पर्धा परीक्षा पार पडत आहे; मात्र यापरीक्षेला खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी विरोध केला होता. आरक्षणावरील स्थगिती उठत नाही, तोपर्यंत परीक्षा घेऊ नये अशी भूमिका घेतली होती; परंतु परीक्षा झाल्या नाहीत, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. आरक्षणाचा लढा हा सरकारशी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी हे परीक्षेची तयारी करीत असतात. अनेकांना ही शेवटची संधी असू शकते त्यामुळे परीक्षेला विरोध करण्यापेक्षा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे. या परिक्षेसाठी छावा संघटनेचे समर्थन असले तरी नौकर भरतीला कायम विरोध राहणार आहे. सरकारने योग्य ती भूमिका घेणे आवश्यक असल्याचेही नानासाहेब जावळे पाटील यांनी यावेळी सांगितले.